भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते.
आयुष्यातील तणावपूर्ण घटनांमुळे अनेकदा प्रचंड डोकेदुखी जाणवते, अंग दुखते, विलक्षण थकवा जाणवून आजारी असल्यासारखे वाटते. भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते. पण तो असतो मानसिक आजार.
अनेक प्रकारची दुखणी वा छोटे-मोठे आजार सगळ्यांना होतच असतात. कधी सामान्य तर कधी दुर्धर, कधी मजेशीर तर कधी कधी चमत्कारिक वाटणाऱ्या दुखण्यांचे अस्तित्व हे माणसाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण अनेक वेळा ही सगळी दुखणी व लक्षणे जरी शारीरिक आजार म्हणून रुग्ण सांगत असले तरी वैद्यकीय शास्त्रातला माहीत असलेला आजार मात्र या रुग्णांमध्ये सापडत नाही. इतकी अनेक प्रकारची लक्षणे असतात की, कुठलाही एक अमुक आजार आहे म्हणून लक्षात येत नाही.
मनात दडलेल्या मानसिक त्रासाचा पूर्ण परामर्श घेऊनच अशा मानसिक आजारांचे निदान केले जाते. यासाठी रुग्णांशी खोलवर संवाद साधणे आवश्यक आहे.